उमरगा येथे विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत

उमरगा: उमरगा शहरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच हुंड्यासाठी आणि घरगुती कारणावरून होणाऱ्या वादातून एका २२ वर्षीय विवाहितेचा दि. १७ रोजी पतीने गळा आवळून खून केला आहे. 
       मिळालेल्या माहितीनुसार, मृत विवाहिता पलक धनराज शिंदे हिचा विवाह ४ मे २०२३ रोजी आरोपी दत्ता शामराव कांबळे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुखात गेल्यानंतर, पतीने किरकोळ कारणावरून पलकला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. "तू लवकर उठत नाहीस, तुला स्वयंपाक करता येत नाही," अशा कारणांवरून तिला मारहाण केली जात होती. तसेच, आरोपी पतीने टू व्हिलर दुरुस्तीचे दुकान टाकायचे आहे. माहेर वरुण दोन लाख रुपये आणण्याची मागणी लावून धरली होती. ही मागणी पूर्ण होत नसल्याने त्याने पलकचा छळ अधिकच वाढवला होता. नातेवाईकांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.
           दि.१७ रोजी रात्री ११:४४ च्या सुमारास, आरोपीने पलकचा गळा आवळून तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच माहेरच्या लोकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालातून तिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी मृत विवाहितेच्या केशर धनाजी शिंदे या आईच्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपी पती दत्ता कांबळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी दत्ता कांबळे यास जेरबंद करण्यात आले आहे . आरोपी वर भारतीय . न्याय. संहिता १०३ , ८० , ८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अशा क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.