“मला आई-वडील दोघेही हवेत!” – चिमुकल्याच्या हाकेने ३ वर्षांचा वाद संपला धाराशिव न्यायालयात भावनिक क्षण; मुलाच्या शब्दांनी आई-वडील पुन्हा एकत्र

धाराशिव, दि. २२ एप्रिल २०२६ :
धाराशिव येथील कौटुंबिक न्यायालयात एका हृदयस्पर्शी घटनेत ३ वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या पती-पत्नीने पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ८ वर्षांच्या मुलाच्या निरागस आणि भावनिक शब्दांनी हा वाद मिटला.
सुनावणीदरम्यान तडजोडीच्या प्रक्रियेत मुलाला विचारण्यात आले की, “तुला आईची गरज आहे की वडिलांची?” यावर मुलाने दिलेले उत्तर उपस्थित सर्वांच्या मनाला भिडणारे ठरले.
“मला आई आणि वडील दोघांचीही गरज आहे, आणि त्यांनी माझ्यासाठी एकत्र राहावे,” अशी आर्त विनंती मुलाने केली.
या भावनिक क्षणामुळे पती-पत्नीच्या मनातील मतभेद दूर झाले आणि त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. संबंधित दाम्पत्याचा विवाह २०१५ मध्ये झाला होता व कौटुंबिक वादामुळे ते मागील ३ वर्षांपासून वेगळे राहत होते.
या प्रकरणात ॲड. एम. बी. माढेकर, ॲड. धर्मराज सरडे आणि ॲड. विशाल बारकुल यांनी मध्यस्थी करत समुपदेशनाद्वारे दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महाराष्ट्र फॅमिली कोर्ट रूल्स १९८७ च्या कलम ३१ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या तडजोडपत्रावर दोन्ही पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, आजपासून ते एकत्र राहून आपल्या मुलाचा सांभाळ करणार आहेत.
ही घटना केवळ एक कौटुंबिक वाद मिटल्याची नाही, तर एका चिमुकल्याच्या निरागस भावनांनी कुटुंब पुन्हा एकत्र आल्याची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.