मनसे शहर उपाध्यक्ष अविनाश पवार यांचे निवेदन; तुळजापूरात बेकायदेशीर वास्तव्यास व अनधिकृत व्यवसायांवर कारवाईची मागणी

तुळजापूर, दि. _२४ एप्रिल २०२६. : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुळजापूर शहर उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी तुळजापूर शहर व तालुक्यात वाढत्या बेकायदेशीर वास्तव्यास, अनधिकृत कामगार, फेरी व्यवसाय व अनधिकृत बांधकामांबाबत पोलीस प्रशासनाकडे निवेदन देत तात्काळ कडक कारवाईची मागणी केली आहे.


सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय व्यक्ती कोणतीही वैध कागदपत्रे किंवा पोलिस पडताळणी न करता वास्तव्यास असून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या काम करत आहेत. हॉटेल्स, खानावळी, बांधकाम साईट तसेच रस्त्यांवरील फेरी व्यवसायामध्ये अशा व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच, अनेक घरमालकांकडून पोलिस पडताळणी न करता अशा व्यक्तींना भाड्याने घरे देण्यात येत असल्याची गंभीर बाबही पवार यांनी मांडली आहे. काही ठेकेदार विना नोंदणी कामगार ठेवत असून कामगार कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षेला धोका, स्थानिक युवकांच्या रोजगारावर परिणाम, तसेच अस्वच्छ अन्न विक्रीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अविनाश पवार यांनी पुढील मागण्या केल्या आहेत :
तुळजापूर शहर व तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवून सर्व संशयित व्यक्तींची पोलिस पडताळणी करावी, विना परवाना वास्तव्यास असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अनधिकृत कामगार व संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच अनधिकृत फेरी व्यवसाय तात्काळ बंद करून संबंधित गाड्या/ठेले जप्त करावेत.
याशिवाय, पोलिस पडताळणी न करता भाड्याने घरे देणाऱ्या घरमालकांवर कारवाई करावी व पोलीस, नगरपालिका, कामगार विभाग व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे विशेष मोहीम राबवावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
दरम्यान, या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करण्यात आली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुळजापूरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शहर उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी दिला आहे.