धाराशिव जिल्ह्यात सेमी-इंग्रजी शिक्षणाबाबत निर्णय घाईत नको – डॉ. जितेंद्र कानडे यांची मागणी

धाराशिव, दि. २१ एप्रिल २०२६ : जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करण्याबाबत दि. २२ एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने सेमी-इंग्रजी माध्यमाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, यापूर्वी २०१२ मध्ये असा ठराव मंजूर होऊनही २०२२ मध्ये झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण कारणांमुळे तो रद्द करण्यात आला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


त्या पार्श्वभूमीवर, त्या वेळी नोंदविण्यात आलेले आक्षेप, निर्देश आणि त्यावरील उपाययोजना पुन्हा स्पष्टपणे मांडण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सेमी-इंग्रजी शिक्षणाचा निर्णय हा केवळ राजकीय स्टंट ठरू नये, तर तो विद्यार्थ्यांच्या हिताचा ठरेल यासाठी ठोस नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयानंतर अभ्यासक्रम, शिक्षकांचे प्रशिक्षण, विषयांची गुणवत्ता, शासनाची मान्यता, तसेच इयत्ता ५ वी नंतरच्या शिक्षणाची सुसंगत व्यवस्था याबाबत स्पष्ट आराखडा सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः गणित व विज्ञान विषयांच्या गुणवत्तेबाबत योग्य निकष निश्चित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
योग्य नियोजनाअभावी विद्यार्थ्यांचे व पालकांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच, जर हा निर्णय सर्व बाजूंनी विचार करून आणि सक्षम पर्यायांसह घेतला गेला, तर विरोधी सदस्य असूनही आपण सहकार्य करू; मात्र अविचारी निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी ठाम विरोध केला जाईल, असा इशाराही डॉ. कानडे यांनी दिला आहे.