परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी कुख्यात टोळी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या २४ तासांत जेरबंद

परंडा (दि. २५ एप्रिल २०२६) : परंडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कुंभेज येथे २५ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या गंभीर घटनेचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत कुख्यात टोळीला जेरबंद केले आहे.
मौजे कुंभेज येथील कॅनॉलजवळील शेतवस्तीवर राहणारे माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे आपल्या पत्नीसह घरासमोर झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी अचानक हल्ला चढवला. आरोपींनी चाकूने प्राणघातक वार करून जगताप यांना गंभीर जखमी केले तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेत घटनास्थळावरून पळ काढला.
घटना रात्रीच्या अंधारात घडलेली असून परिसरात सीसीटीव्ही नसल्याने आरोपींचा शोध घेणे आव्हानात्मक होते. तसेच जखमी व धास्तावलेल्या पीडितांकडून ठोस माहिती मिळणे कठीण झाले होते.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (भूम) श्री चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी विशेष पथकाची स्थापना केली.
सपोनि सचिन खटके व सपोनि अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहिती व गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी डोकेवाडी परिसरात लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये—
किरण पंडीत शिंदे (रा. अनाळा)
राघवा निवांत्या शिंदे (रा. अनाळा)
ज्ञानेश्वर लिग्या काळे (रा. हिवर्डा)
विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी)
सुनिल प्रकाश भोसले (रा. अंजनसोंडा)
चेतन किरण शिंदे (रा. अनाळा)
सुनिल चरण शिंदे (रा. अनाळा)
यांचा समावेश आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी दोन मोटारसायकलवरून येऊन कॅनॉलजवळ वाहन लावून पायी शेतवस्तीवर जाऊन दरोडा टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे ३० हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम सोन्याचे गंठन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल (एकूण किंमत अंदाजे १.५५ लाख रुपये) जप्त केले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, सपोनि अमोल मोरे यांच्यासह त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.