राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तुळजापूर उपशहराध्यक्ष किरण यादव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन;तुळजापूरच्या नागरी समस्यांवरून किरण यादव आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी


तुळजापूर, दि.27 एप्रिल 2026 : तुळजापूर शहरातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तुळजापूर उपशहराध्यक्ष किरण यादव यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन सादर केले. हे निवेदन तहसीलदार तुळजापूर यांच्या मार्फत देण्यात आले.
सदर निवेदनात शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


तसेच शहरातील पाणीपुरवठा दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली असून इतर मूलभूत सुविधांबाबतही प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यामुळे नगर परिषद तुळजापूर येथील मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किरण यादव यांनी केली आहे.
अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.