तेरणा अध्ययन केंद्राची यशस्वी घोडदौड; 14 विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तेरणा अध्ययन केंद्र ठरले आशेचा किरण; 14 जणांचे शासकीय स्वप्न पूर्ण



धाराशिव : डॉ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राच्या माध्यमातून सन 2026 मध्ये तब्बल 14 विद्यार्थ्यांनी विविध शासकीय पदांवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील होतकरू व जिद्दी विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत आहे.
आदरणीय डॉ. साहेबांच्या दूरदृष्टीतून आणि प्रेरणेतून सन 2014 पासून सुरू झालेल्या या उपक्रमाने गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञान, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी हे अध्ययन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरत असून, येथून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत.


यंदा यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अतुल करवर यांची महसूल सहाय्यकपदी निवड झाली असून, अविनाश वाघमारे, अभिजित ओव्हाळ, रामलिंग निलाखे, कृष्णा कुंभार तसेच शंकर पालखे यांनी पोलीस दलात निवड मिळवून संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे कौतुक करत त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


या उपक्रमामध्ये आदरणीय मल्हार दादा पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभत असून, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे सर तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन व वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांमुळे यशाची ही परंपरा कायम सुरू आहे.
यावेळी अध्ययन केंद्राचे व्यवस्थापक श्री. विठ्ठल गायकवाड व सहकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, दर्जेदार अभ्यासाचे वातावरण आणि प्रेरणा मिळाल्यास ते कोणतेही यश मिळवू शकतात, हे या यशस्वी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
— विठ्ठल गायकवाड
तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव
मो. 9545753347