दिंडेगाव बनावट ठराव प्रकरणी अद्याप कारवाई नाही; सावित्रीबाई घोडके यांचा प्रशासनावर आरोप



तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथील बनावट ठराव प्रकरणात प्रशासनाने चौकशी व अभिलेख पडताळणीचे आदेश दिले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप श्रीम. सावित्रीबाई शिवराम घोडके यांनी केला आहे.


मृत व्यक्तीच्या नावे बनावट ठराव क्र. २२ तयार करून बंडाप्पा घोडके यांचे नाव रेकॉर्डवरून कमी करण्यात आल्याची तक्रार त्यांनी प्रशासनाकडे केली होती. तसेच सन १९७०/७१ च्या मूळ अभिलेखांनुसार नाव पूर्ववत करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणी पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतीस संबंधित अभिलेखे सादर करण्याचे तसेच सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही संबंधितांकडून कोणतीही प्रत्यक्ष कारवाई, जबाबदारी निश्चिती किंवा रेकॉर्ड दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे सावित्रीबाई घोडके यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करून मूळ रेकॉर्ड पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.