तुळजापूरात ‘तपोरत्न भक्तनिवास’चे भूमिपूजन; भाविकांच्या सुविधेत मोठी भर काशीपीठ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांच्या हस्ते भव्य भक्तनिवास प्रकल्पाचा शुभारंभ

तुळजापूर, दि. 29 : तुळजापूर येथील जंगम मठ येथे होटगी मठ संस्थांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य “तपोरत्न भक्तनिवास” प्रकल्पाचे भूमिपूजन काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.


यावेळी बोलताना जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी म्हणाले की, श्री तुळजाभवानी देवीचे महात्म्य संपूर्ण देशभर पसरले असून दररोज लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापूरात येतात. अशा परिस्थितीत उभारण्यात येणारे भक्तनिवास भाविकांच्या सुविधेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच या परिसरात महादेव मंदिर व सभामंडप उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर होते. व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष विनोद गंगणे, गुड्डापूर देवस्थान समितीचे सिद्धया स्वामी, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, रामप्पा चिवडशेट्टी, माजी उपनगराध्यक्ष अमर मगर, गटनेते औदुंबर कदम, नगरसेवक रणजीत इंगळे, आनंद जगताप, गुरुनाथ बडूरे आदी मान्यवर उपस्थित होते.


सर्वप्रथम गहिनीनाथ महाराज औसेकर, अर्चनाताई पाटील व विनोद गंगणे यांच्या हस्ते भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, काशीपीठाच्या जगद्गुरूंच्या आशीर्वादाने सुरू झालेले हे काम निश्चितच पूर्णत्वास जाईल. नगरपालिका व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे या प्रकल्पाला सर्वोत्तरी सहकार्य राहील. तसेच या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


काशी विश्वनाथ मंदिराकडून दरवर्षी श्री तुळजाभवानी मंदिरासाठी मानाचे महावस्त्र येण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात गहिनीनाथ महाराज औसेकर व आमदार विजयकुमार देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यास होटगी संस्थेचे सचिव शांतया स्वामी, संचालक शशिकांत रामपुरे, शिवानंद पाटील, संगप्पा महमाने, केदार उंबरजे, श्रीशैल अंबारे, विजय कंदले, मधुकर शेळके, आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे, सागर कदम, अनंत कोंडो, ॲड. गिरीश शेटे, प्रफुल मस्के, महाबळेश्वर तोडकरी, भारत कोप्पा, लक्ष्मण उळेकर, महेश नडमने, अभिषेक कोरे, विश्वनाथ शेटे, सौ. अस्मिता शेटे, गौरीशंकर साखरे, राजकुमार बुट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे धार्मिक विधी परमेश्वर शास्त्री यांनी पार पाडले. कार्यक्रमानंतर जगद्गुरूंनी पायी चालत जाऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तसेच कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धाराम यांनी जंगम मठास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.