आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल



तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आशा आकाश शेगर (वय 24, रा. येडोळा ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी दि. 10 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.
या प्रकरणी फिर्यादी दत्ता देवराव चव्हाण (वय 52, रा. येडोळा) यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश दत्ता शेगर, चांगुणाबाई दत्ता शेगर, भाग्यश्री दिलीप चव्हाण व तात्याराव राजाराम चव्हाण (सर्व रा. येडोळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपींनी मयत आशा हिला “तु काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस, तु तुझ्या घरी जा, आम्हाला तुला नांदवायचे नाही,” असे म्हणत वारंवार शिवीगाळ, मारहाण तसेच मानसिक व शारीरिक छळ केला. या सततच्या त्रासाला कंटाळून आशा यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 80, 85, 108 व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.