कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पॉक्सो व बलात्कार प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

कळंब : शिरढोण पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या पॉक्सो व बलात्कार प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय कळंब यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी क्रमांक 3 अजित शेळके यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणात गुन्हा क्रमांक 76/2023 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 376(3), 376(2)(n), 376(2)(J) तसेच पॉक्सो कायद्यान्वये कलम 4, 6, 8 व 12 अंतर्गत चार आरोपींवर अल्पवयीन पीडितेवरील अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेभोसले यांच्या न्यायालयात खटला क्रमांक 148/2023 नुसार चालला.
सरकार पक्षाच्या वतीने पीडिता, तिचे आई-वडील, डॉक्टर, डीएनए तपासणी अधिकारी, फॉरेन्सिक अधिकारी, पंच, तपास अधिकारी तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करण्यात आले. आरोपी क्रमांक 3 अजित शेळके यांच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी सरकार पक्षाच्या साक्षीदारांचा विविध मुद्द्यांवर उलटतपास केला.
बचाव पक्षाने न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादानुसार आरोपीविरुद्धचे आरोप मोघम व विसंगत असल्याचे सांगण्यात आले. कथित घटना नेमकी कधी व कुठे घडली याबाबत स्पष्टता नसल्याचे, तसेच वैद्यकीय तपासणी व डीएनए अहवालामध्ये आरोपी क्रमांक 3 विरोधात ठोस पुरावे नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने उपस्थित केला.
तसेच पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत सकृतदर्शनी पुरावे आढळले नसल्याचे आणि आरोपी क्रमांक 3 यांचा गुन्ह्याशी संबंध सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद ॲड. विशाल साखरे यांनी केला.
सर्व बाजूंचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेभोसले यांनी आरोपी अजित शेळके यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. भाग्यश्री जगदाळे (तुळजापूर), ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. संकेत गोरे, ॲड. रोहित लोमटे आणि ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.