बहुचर्चित तामलवाडी पीटा प्रकरणातील आरोपीस जिल्हा न्यायालयाकडून तात्काळ जामीन, ॲड विशाल साखरे यांचा प्रभावी युक्तिवाद


तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बहुचर्चित पीटा (PITA) प्रकरणात आरोपी क्रमांक २ तथा हॉटेल मालक संतोष पवार यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने तात्काळ नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी बाजू मांडली.
धाराशिव येथील Prevention of Immoral Traffic विभागाने तामलवाडी येथील मिलन लॉजवर छापा टाकून कारवाई केली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी दोन बांगलादेशी तरुणी व एक महाराष्ट्रातील तरुणीकडून देहविक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईनंतर तामलवाडी पोलीस ठाण्यात पीटा कायद्यासह भारतीय न्याय संहिता कलम 143 व 144 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपी क्रमांक २ यांच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. युक्तिवाद करताना त्यांनी सांगितले की, आरोपीने संबंधित हॉटेल खरेदी करण्यासाठी करारनामा केला असून इसार रक्कम भरून दुरुस्तीचे काम सुरू होते. हॉटेलमध्ये घडणाऱ्या कथित प्रकाराची त्यांना कोणतीही माहिती नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
तसेच पोलिसांनी नमूद केलेल्या बांगलादेशी महिलांशी आरोपी क्रमांक २ यांचा कोणताही प्रत्यक्ष संबंध असल्याचा प्रथमदर्शनी पुरावा तपासात आढळलेला नसल्याचेही न्यायालयास निदर्शनास आणून देण्यात आले.
“Bail is Rule and Jail is Exception” हा कायदेशीर सिद्धांत मांडत केवळ आरोपांच्या आधारे आरोपीस कारागृहात ठेवणे योग्य नसल्याचा युक्तिवाद ॲड. साखरे यांनी केला. आरोपीकडून तपासादरम्यान पीटा कायद्याशी संबंधित कोणताही ठोस पुरावा निष्पन्न झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय जिल्हा न्यायाधीश श्री. ठुबे यांनी आरोपी क्रमांक २ यांचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. भाग्यश्री जगदाळे (तुळजापूर), ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. संकेत गोरे, ॲड. रोहित लोमटे व ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.