एस.टी. भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी; परिवहन मंत्र्यांना निवेदन

धाराशिव, दि. 24 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलीकडेच लागू केलेली एस.टी. बस प्रवास भाड्यातील अतिरिक्त 13.5 टक्के वाढ तात्काळ रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांना विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धाराशिव यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एस.टी. ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी जीवनवाहिनी आहे. वाढत्या महागाईच्या काळात प्रवास भाड्यात करण्यात आलेली वाढ ही सर्वसामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी असून, इंधन, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत एस.टी. भाडेवाढ अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी एस.टी. प्रवास भाडेवाढ तात्काळ रद्द करावी, विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना अधिक सवलती द्याव्यात, ग्रामीण भागातील एस.टी. सेवा अधिक नियमित, सुरक्षित व दर्जेदार करावी तसेच भविष्यात कोणतीही भाडेवाढ करण्यापूर्वी जनतेच्या हिताचा विचार करून संबंधित घटकांशी चर्चा करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश इंद्रसिंह राजेनिंबाळकर, प्रशांत पाटील, जावेद काझी, अभिषेक बागल, संकेत पडवळ, मोईब पठाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.