धाराशिव जिल्हा काँग्रेसकडून MHT-CET कथित घोटाळा व पदोन्नतीतील अनियमिततेविरोधात निवेदने

धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी, २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी धाराशिव तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत दोन महत्त्वाची निवेदने संबंधित मंत्र्यांना सादर करण्यात आली.
पहिल्या निवेदनात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित MHT-CET परीक्षा प्रक्रियेत गेल्या तीन वर्षांपासून कथित घोटाळे व अनियमितता होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करावे तसेच परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुसऱ्या निवेदनात धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नती प्रक्रियेत शासनाचे नियम, निर्देश आणि न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करून पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनांक ३ जुलै २०२६ रोजी झालेली पदोन्नती प्रक्रिया तात्काळ रद्द करून राज्यस्तरीय चौकशी करावी, नव्याने पारदर्शक पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया राबवावी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
ही निवेदने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, विनोद वीर, अग्निवेश शिंदे, सरफराज काजी, संजय गजधने, बाबा मोमीन आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.