तिर्थ (बु) येथे नवीन आरोग्य उपकेंद्र मंजुरीचा मार्ग मोकळा; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश



तुळजापूर | धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील तिर्थ (बु) येथे नवीन आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद धाराशिवच्या आरोग्य विभागाने तुळजापूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
जि.प. सदस्या सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी दिनांक 17 जुलै 2026 रोजी तिर्थ (बु) येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याबाबत पत्र दिले होते. तसेच तिर्थ (बु) ग्रामपंचायतीकडूनही दिनांक 16 जुलै 2026 रोजी याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या मागणीची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी तिर्थ (बु) नवीन आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव नियमानुसार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

गावातील लोकसंख्या व अंतराचा दाखला, ग्रामपंचायतीचे हमीपत्र, 7/12 उतारा, गाव नकाशा, 2-अ व 2-ब लोकसंख्येचा तक्ता तसेच आरोग्य सेवा संचालनालयाच्या नियमानुसार आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
संबंधित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतींमध्ये जिल्हा आरोग्य कार्यालयाकडे सादर केल्यानंतर तिर्थ (बु) येथे नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करणे सोयीचे होणार आहे.
या निर्णयामुळे तिर्थ (बु) परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या आशा अधिक बळावल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मागणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.